Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत घेण्यास मागे पुढे पाहणार नाही - शरद पवार

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्ताही स्थापन करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींसह एनडीएमधील 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोदींना समर्थन दिले आहे, विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकाही खासदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. तरीही, विकासाच्या मुद्द्यावरुन आपण मोदी सरकारसोबत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आता, शरद पवार यांनीही बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही, असे विधान केले आहे. बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला. यावेळी, बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच,  

आज आनंदाचा दिवस, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो तेव्हा पावसाची सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दोन नंबरला गेला, राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन जास्त झालं, पण केंद्र सरकारने निर्बंध आणले, हे निर्बंध आणू नका, असे मी त्यांना सांगितलं होतं. मात्र, निवडणूक होईपर्यंत आम्ही तुमचे ऐकणार नाही, असे मला सांगण्यात आले. केंद्र सरकारने यंदा इथेनॉलला बंदी घातली,  त्यामुळे कारखानदारीचे नुकसान झाले. अपेक्षा अशी आहे की, हे चित्र आता बदलेल, असे म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर भाष्य केले. 

भाजपच्या 60 जागा कमी झाल्या

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामधील लोकांचे आभार मानले पाहिजे, गेली 10 वर्षे मोदी शाह यांची सत्ता होती. पण यंदा निकाल वेगळा दिसला, या देशात स्थिरता येईल अशी अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थीर कशी राहिल याचा विचार केला पाहिजे, आज सत्तेत आले आहेत त्यांना 300 पेक्षा जास्त जागा निवडून दिल्या होत्या. पण, आता त्या 240 झाल्या आहेत. म्हणजेच त्यांच्या 60 जागा कमी झाल्या. 

अयोध्येत भाजपचा पराभव

राम मंदिर हा प्रचाराचा मुद्दा असेल मला वाटायचं, राम मंदिराचा मुद्दे घेत सत्ताधारी पक्षाला मतदान जाईल असे वाटत. मंदिराची भीती आम्हाला वाटत होती. पण, जिथं मंदिर बांधले तिथेच भाजपचा पराभव झाला. जमिनीवर पाय ठेवून काम केले पाहिजे, असे जनतेने मतदानातून दाखवून दिलं. त्यामुळे, मोदींना सरकार बनवताना बाकीच्यांची मदत घ्यावी लागली. जेव्हा दुसऱ्याची मदत घ्यावी लागते तेव्हा सरकार स्थीर असावे अशी अपेक्षा आहे. इथे मागच्या वेळी काय झालं त्याचा खुलासा केला त्याची गरज नाही, असेही पवार यांनी म्हटले. 

बारामतीची चर्चा न्यूयॉर्कमध्ये

निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी कानावर येत होत्या, पण मी शांत होतो. मला मला माहिती होतं की बारामतीकर सुज्ञ आहेत, त्याचा अनुभव मला आला. मतदारांनी शहापणा दाखवला हे मी फक्त आज बघतो अस नाही, हा 1967 पासून बघतो आहे. पण, यंदा बारामतीची चर्चा न्यूयॉर्कमध्ये झाली. तुम्ही काय साधी लोकं आहात, कुठपर्यंत जाऊन पोहोचलात, असे म्हणत बारामतीकरांचं कौतुकही केलं. 

मोदींची सुद्धा मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही

आता महाराष्ट्रामध्ये सुरुवात करायची आहे, 48 पैकी आमच्या 30 जागा निवडून आल्या असून विधान सभा निवडणुकांवर लक्ष ठेवले पाहिजे. आम्ही सत्तेत असताना काही धोरणे आखली त्याचा फायदा आता दिसतो आहे. आता पुढील काळात बारामतीत आणखी मोठे उद्योग आणणार, यासाठी तुमचे सहकार्य पाहिजे, त्यासाठी हा कार्यक्रम आहे, असे म्हणत बारामतीमधील व्यापाऱ्यांना शरद पवारांनी आश्वासन दिले. इथे राजकारण आणायचे नाही राज्य आणि केंद्र सरकारशी बोलून मी प्लॅन करत आहे. आम्ही निवडणूक मध्ये टीका टिप्पणी केली. मोदींनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. पण, मी त्यावर काही बोलणार नाही. विकासासाठी मोदींचीसुद्धा आगामी काळात मदत घ्यायला मी मागेपुढे बघणार नाही, असे म्हणत बारामतीच्या विकासाासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी आपल्या भाषणातून सूचवले. तसेच, तुम्ही प्रचंड बहुमत दिल्याचे सांगत बारामतीकरांना धन्यवादही दिले.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने