Shikshak amdar : सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडविल्याने साखर सम्राटांमध्ये भिती, आमदार दराडे यांचा घणाघात

 


ब्युरो टीम :  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरात रविवारी (दि.16 जून) पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला. मागील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असून, त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर डमी उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केले गेले नसल्याचा खुलासा केला. सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नसल्याने साखर सम्राटांमध्ये भिती निर्माण झाली असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला नाव न घेता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना लगावला.

या पत्रकार परिषद प्रसंगी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले, सचिव संभाजी पवार, कुमार म्हस्के, अहमदनगर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, भास्करराव सांगळे, गायकवाड सर, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, समीर पठाण, सुभाष भागवत, वैभव सांगळे, अशोक आव्हाड आदी उपस्थित होते.

पुढे आमदार दराडे म्हणाले की, 'ही शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे, साखर कारखान्याची नाही. डमी उमेदवार देऊन दिशाभूल करण्याइतपत शिक्षक अज्ञानी नाही. नाशिक शिक्षक मतदार संघात काम मोठ्या प्रमाणात केल्याने, विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, यासाठी ते शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट करुन दराडे यांनी अपक्ष उमेदवार कोल्हे यांचा समाचार घेतला.  

शिक्षकांच्या प्रश्‍नावर दराडे यांनी सर्वाधिक प्रश्‍न मांडले व अनेक प्रश्‍न सोडवली. 19 वर्षापासून प्रलंबीत असलेला जुनी पेन्शन योजनेचा प्रश्‍नावर आवाज उठविल्याने तो प्रश्‍न पटलावरती आला व ते सोडविण्याचे काम सुरू आहे. 2005 नंतरच्या शिक्षकांसाठी सकारात्मक निर्णय होणार आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक दरबार ही नवीन संकल्पना मांडली व शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम केले. कामाच्या जीवावर शिक्षकांकडे मते मागत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अनेक शिक्षक संघटना व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती बरोबर आहे. टीडीएफचे खूप प्रकार असून, नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यातूनही या संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे. शिक्षक मतदार संघाच्या इतिहासात सर्वाधिक पंधराशे कोटी रुपयांचा निधी उत्तर महाराष्ट्रात आणला. शिक्षकांची सर्व बिले निघाली. शिक्षक भरतीचा प्रश्‍न सोडविण्याचे काम केले. अनुकंपाचे ऑर्डर, शालर्थ आयडी, आश्रम शाळेतील प्रश्‍न, नॅशनल बँकेतून पगार आदी प्रश्‍न सोडविल्याने शिक्षकांचा कौल आपल्याकडे आहे. जिल्ह्यातील वाडी-वस्तीवरील शाळांमध्ये संगणक प्रिंटर पोहचविण्याचे काम केले. त्यामुळे सर्व शिक्षक वर्गा पर्यंत कामातून पोहचलो आहे. स्पर्धा कोणाशीही नसून, आत्ता आलेली पोरं ज्यांना शिक्षण क्षेत्रातील काहीही सांगता येणार नाही. मात्र शिक्षण क्षेत्रातील रतीमहारती माझ्याबरोबर असल्याचा दावा दराडे यांनी केला.

शिक्षकांचे विविध प्रश्‍न सोडविल्याबद्दल पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी पाठिंब्याचे पत्र दराडे यांना दिले. तर अपक्ष उमेदवार कुंडलिक दगडू जायभाय व नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले यांनी पाठिंबा जाहीर केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने