Sunil Tatkare : राष्ट्रवादी 'या' जिल्ह्यातील बाराही जागा लढवण्याची तयारी सुरु ? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला आढावा

 

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकांतील निकालावरुन सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या ताकदीचा अंदाज आला आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांची तयारी आता सुरु झाली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना व आमदारांना सूचना केल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभेची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही लवकरच महाराष्ट्र दौरा करत आहेत. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर याचाही अंदाज पक्षाचे नेते घेत आहेत. 

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बाराही जागा लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस रणनीती आखत असून तसे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिले आहेत. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाहाटा यांनी 12 जागांवरील चाचपणी सुरू असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून ते सकाळच्या टप्प्यात शहर जिल्हा कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर दुपारी दक्षिण नगर जिल्हा लोकसभा मतदारसंघातील कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांचे बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर, ते दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेतील घेणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष नाहाटा यांनी दिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विधानसभेचं जागावाटप लवकर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनी 80 ते 90 जागा आणि शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला देण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे, विधानसभेचं जागावाटपही मोठं अडचणीचं ठरणार असल्याचं दिसून येतं.  

अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघ

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अहमदनगर जिल्ह्यात येत असून येथील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या मतदारसंघाचा समावेश अहमदनगर जिल्ह्यात होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वच 12 जागांवर चाचपणी सुरू असून शरद पवार यांच्या पक्षाकडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असे येथील आमदार विभागले गेले आहेत. जिल्ह्यातील 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे पाहायल मिळते. 

कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर, अकोलेचे आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही अजित पवारांसोबत आहेत. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. अहमदनगर शहरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आमदार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने