T 20 world Cup : भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचे सुपर 8 फेरीचं गणित बिघडले; आता विजय आवश्यक

 

ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. या गटातून भारत आणि अमेरिकेची कामगिरी चांगली राहिली आहे. तर पाकिस्तानला अजूनही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे. सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने आता पुढच्या प्रवासासाठी भारतावर अवलंबून राहावं लागणार आहे. पाकिस्तानचा संघ सलग दोन सामन्यात पराभूत झाला आहे. आणखी एका पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरी गाठता येऊ शकते. पण यासाठी भारताच्या मदतीची गरज लागणार आहे. इतकंच काय तर आयर्लंडपुढेही पाकिस्तानला लोटांगण घालावं लागणार आहे. या दोन संघांनी अमेरिकेला पराभूत केलं तर पाकिस्तानचा सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे.

भारत आणि अमेरिकेने दोन सामन्यात विजय मिळवल्याने 4 गुण आहेत.पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकले तरी 4 गुण होतील. पाकिस्तानला कॅनडा आणि आयर्लंडला पराभूत करावं लागेल.तसेच अमेरिकेला पुढचे दोन्ही सामने गमवावे लागतील. तर भारताने पुढचे दोन्ही सामने जिंकायला हवेत. पाकिस्तानचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे तर अमेरिकेचा प्लस आहे. भारताने अमेरिकेला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर फायदा होईल.

पाकिस्तानचा सामना आज कॅनडाशी होणार आहे. अमेरिकेच्या नासाऊ स्टेडियममध्ये ही लढत होणार आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर बाहेरचा रस्ता आहे. दुसरीकडे, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तानला फटका बसेल आणि सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगेल. हवामान खात्यानुसार या सामन्यात 15 ते 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे.

टी20 विश्वचषक 2024 मधील ‘अ’ गटातील उर्वरित सामने

पाकिस्तान विरुद्ध कॅनडा – 11 जून

अमेरिका विरुद्ध भारत – 12 जून

अमेरिका विरुद्ध आयर्लंड – 13 जून

भारत विरुद्ध कॅनडा – 15 जून

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड – 16 जून


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने