ब्युरो टीम : टीम इंडियाने बुधवारी 12 जून रोजी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यजमान यूनायटेड स्टेट्स टीमला पराभूत करत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने यूएसएला 7 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडिया या विजयासह सुपर 8 मध्ये पोहचली. टीम इंडियाच्या या सलग तिसऱ्या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा आनंदी दिसला. रोहितने विजयानंतर म्हटलं माहित होतं की अमेरिके विरुद्ध जिंकणं सोपं नसणार. रोहितने अमेरिकेच्या खेळाडूंबाबतही प्रतिक्रिया दिली.
हिटमॅन काय म्हणाला?
सहज सामना जिंकता येणार नाही, हे माहित होतं. आम्ही ज्या प्रकारे धीर ठेवला आणि भागीदारी केली. त्याचं श्रेय आमचं आहे. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी आम्हाला विजय मिळवून दिला. तसेच रोहितला अमेरिकेसाठी खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंबाबत विचारण्यात आलं. त्यावर रोहित म्हणाला की मी यातील बहुतेकांसह खेळलोय. त्यांचा विकास पाहून मी आनंदी आहे. गेल्या वर्षी मी त्यांना एमएलसीमध्ये पाहिलं. ते सर्व कठोर मेहनत करणारे आहेत. तसेच रोहितने सुपर 8 मध्ये पोहचणं मोठा दिलासा असल्याचं म्हटलं. इथे क्रिकेट खेळणं सोपं नसल्याचंही रोहित म्हणाला.
दरम्यान टीम इंडियाने आधी यूएसएला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 110 धावांवर रोखलं. यूएसएसाठी नितीश कुमारने सर्वाधिक 27 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन टेलरने 24 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर उपकर्णधार हार्दिक पंड्या याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 111 धावांचं आव्हान हे 18.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने नाबाद 50 धावा केल्या. तर शिवम दुबे याने 31 धावांचं योगदान दिलं. सूर्या-शिवम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची नाबाद भागीदारी केली. तर त्याआधी ऋषभ पंत 18 आणि रोहितने 3 धावा केल्या. तर विराट कोहलीला खातंही उघडता आलं नाही. यूएसएसाठी सौरभ नेत्रवाळकर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
टिप्पणी पोस्ट करा