USA vs PAK : पाकिस्ताननं चव घातली, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मराठमोळ्या गोलंदाजासमोर टाकली नांगी



ब्युरो टीम : आयसीसी टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा २०२४ स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला विजयासाठी १९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजानी नांगी टाकली. त्यांना सुपर ओव्हरमध्ये एक विकेट गमावून अवघ्या १३ धावाच करता आल्या. अमेरिकेने अशा पद्धतीने या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला. 

पाकिस्तान विरुद्ध अमेरिका मॅचमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर अमेरिकेनं देखील २० ओव्हरमध्ये ३ गडी गमावत १५९ धावा केल्या. त्यामुळे ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. 

सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

पाकिस्तानद्वारे मोहम्मद आमिरने सुपर ओव्हर टाकली. पण अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण आणि स्वैर गोलंदाजी यामुळे अमेरिकेच्या फलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये १८ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकर या मराठमोठ्या गोलंदाजासमोर पाकिस्ताननं नांगी टाकली. इफ्तिकारने एक चौकार लगावत आशा पल्लवित केल्या. पण सौरभच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा इफ्तिकारचा प्रयत्न नितीशच्या अफलातून झेलमुळे यशस्वी झाला नाही. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध फलंदाज संघात असतानाही शदाब खानला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. पण सौरभने टिच्चून मारा करत अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

दरम्यान, या मॅचनंतर अमेरिकेच्या संघाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने