Vidhyut Jamwal : विद्युत जामवालवर सर्कशीत काम करण्याची वेळ; एका मुलाखतीत सांगितला आयुष्यातील कटु प्रसंग

 

ब्युरो टीम : प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल याच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत बॉलिवूडमध्ये त्याच्या फिटनेस आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात जबरदस्त स्टंट असतात. त्याचा क्रॅक हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमाचा तो निर्माता होता. त्याचे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आले आणि जोरदार आपटले. त्यामुळे विद्युत कर्जबाजारी झाला. तो इतका कर्जबाजारी झाला की त्याला या कर्जाच्या खाईतून बाहेर येण्यासाठी थेट सर्कशीत काम करावं लागलं. एका मुलाखतीत त्याने आयुष्यातील हा कटु आणि वेदनादायी प्रसंग सांगितला.

विद्युत जामवालचा क्रॅक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. हा सिनेमा फ्लॉप झाला. हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर सर्कशीत कामाला गेल्याचं विद्युतचं म्हणणं आहे. एका वाहिनीला त्याने मुलाखत दिली. त्यात त्याने हा खुलासा केला. यावेळी त्याने क्रॅकने अपेक्षेपेक्षा जास्त गल्ला जमवला नसल्याचं मान्य केलं. फेब्रुवारीत हा सिनेमा आला. 45 कोटीला हा सिनेमा बनवण्यात आला होता. पण या सिनेमाने केवळ 17 कोटी रुपयांचीच कमाई केली.

पैसा बुडाला

अत्यंत कमी धंदा मिळवून देणारा हा त्याचा दुसरा सिनेमा होता. या आधी आयबी 17 हा सिनेमा फ्लॉप गेला होता. हेरगिरीवर आधारीत हा सिनेमा होता. तो या सिनेमाचा सहनिर्माता होता. या सिनेमासाठी त्याने 40 कोटी रुपये खर्च केला होता. पण कमाई झाली फक्त 29 कोटींची.

थेट सर्कशीत

आधी आयबी 17 आणि नंतर क्रॅक फ्लॉप झाली. त्यामुळे माझा प्रचंड पैसा बर्बाद झाला. त्यानंतर हे कसं हँडल करायचा हा माझ्यासमोर प्रश्न होता. आर्थिक नुकसान झाल्यानंतर अनेकांनी सल्ले दिले. ज्यांनी आर्थिक झळ सोसलीय अशा लोकांनी सल्ले देतात किंवा ज्यांना तुमची काळजी वाटते असे मित्र सल्ले देतात. पण मला या सर्व सल्ल्यांपासून दूर राहायचं होतं. क्रॅक फ्लॉप झाल्यावर मी एक फ्रेंच सर्कस ज्वॉईन केली. काही चांगल्या लोकांसोबत 14 दिवस घालवले, असं तो सांगतो.

अन् सगळं ठिक झालं

मी सर्कशीत अशा लोकांसोबत राहिलो जे कॉन्टोर्शनिस्ट होते. ते आपल्या शरीराला अशा पद्धतीने वाकवायचे ते शक्यच नव्हतं. जेव्हा मी त्यांना पाहतो तेव्हा वाटायचं हे असं कसं होऊ शकतं? या कलाकारांसोबत मी काही काळ घालवला. त्यानंतर जेव्हा मी परत मुंबईत आलो, तेव्हा सर्व काही शांत झालं होतं. सर्व ठिक झालं होतं, असं तो म्हणाला.

तीनच महिन्यात कर्जमुक्त

क्रॅक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात तो कर्जमुक्त झाला होता. जेव्हा मी परत आलो, तेव्हा शांतपणे विचार केला. मनाशीच म्हटलं ठीक आहे. आता एवढे कोटी रुपये गेले. आता काय केलं पाहिजे? पण मी तीन महिन्यात कर्जमुक्त झालो. हा एक चमत्कार आहे. याबाबत मला माझ्या मित्रांनी विचारलं. कर्जमुक्त कसा काय झाला असं ते म्हणाले. तेव्हा मी त्यांना इतकंच सांगितलं की मी तणाव घेतला नाही. एक गेम प्लान तयार केला आणि कर्जमुक्त झालो. मी त्यांना अधिक काही सांगितलं नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने