Virat-Rohit : टी 20 क्रिकेट मध्ये पुन्हा विराट-रोहित दिसणार नाहीत; भारत टी 20 वर्ल्ड कप जिंकतादोघांनी घेतला वेगळा निर्णय

 

ब्युरो टीम : टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगच्या जोरावर मॅच फिरवली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने आजपासून 17 वर्षांआधी 2007 साली पहिलाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा यानेही टी 20i क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना आपण क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. एकमेकांनी एकमेकांना गळाभेट देत अभिनंदन केलं. तेव्हा भारतीय खेळाडूंचा कंठ दाटून आला होता, डोळ्यात आनंदाश्रू होते. मात्र काही वेळाने रोहित शर्मानेही विराट पाठोपाठ टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. विराट-रोहितसारखी अनुभवी आणि आजी माजी कर्णधारांची जोडी निवृत्त झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आपले 2 लाडके खेळाडू वर्ल्ड कपसह निवृत्त होत असल्याचा आनंदही चाहत्यांना आहे. तसेच रोहित आणि विराटने अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20I फॉर्मेटमधून निवृत्तीनंतर वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. विराट आणि रोहितच्या या निर्णयामुळे आता टी 2OI क्रिकेटमध्ये आणखी नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच आता रोहितनंतर हार्दिक पंड्या पूर्णवेळ कर्णधार असल्याचंही निश्चित झालं आहे.

रोहित शर्माची टी20I कारकीर्द

दरम्यान रोहितने इंग्लंड विरुद्ध 19 सप्टेंबर 2007 रोजी टी 20I पदार्पण केलं होतं. रोहितने तिथपासून इथवर आतापर्यंत एकूण 159 सामन्यांमध्ये 140.89 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.34च्या एव्हरेजने 4 हजार 231 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 5 शतकं आणि 32 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितची 121 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर रोहितने एकमेव विकेटही घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने