Good Health : भारतातील टॉप पाच धोकादायक आजार माहिती आहेत का? वाचा काय आहेत लक्षणे



ब्युरो टीम :  भारतामध्ये काही आजारांच्या उपचाराचा खर्च खूपच जास्त आहे. या खर्चाचा एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. अशावेळी तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल, तर तुम्हाला उपचाराच्या खर्चाची चिंता नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील टॉप पाच आजारांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तुम्हाला या उपचाराच्या खर्चापासून दिलासा देण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. चला तर हे आजार नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ.

मधुमेह

मधुमेह (डायबेटिस) हा एक जीवघेणा आजार आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात ते म्हणजे टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. भूक जास्त लागणे, विनाकारण वजन कमी होणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे अशी मधुमेहाची लक्षणे आहेत. तर, चुकीच्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम न करणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इ. मधुमेह होण्याची कारणे आहेत. मधुमेह झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली, पौष्टिक अन्नाचे सेवन, धुम्रपान टाळणे, फायबर युक्त आहाराचे सेवन केल्यास तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता कमी राहील.

मॅलिग्नंट ट्युमर

कॅन्सरच्या पेशीचा हा एक प्रकार असून ज्या अनियंत्रितपणे वाढतात, व संपूर्ण शरीरात पसरतात. त्यामुळे हा आजार होतो. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. किरणोत्सर्गाच्या संपर्कात येणे, अनुवांशिकता, विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे अशा कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही तंबाखूचे सेवन टाळणे, सकस आहार, नियमितपणे लसीकरण, योग्य वजन राहिली अशी जीवनशैली आत्मसात करणे, असे उपाय करू शकता.

अतिसार

अतिसार हा एक धोकादायक आजार आहे. यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते, व शरीर निर्जलीकरण होते. जुलाब होणे, शौचासोबत श्लेष्मा पडणे, पोटात गोळा येणे, मळमळ होणे, पोट दुखणे, रक्त पडणे अशी अतिसाराची लक्षणे आहेत. अशुद्ध पाणी पिणे, आजूबाजूला अस्वच्छता असणे, कुपोषण, कमकुवत प्रतिकारशक्ती, अशी अतिसार होण्याची कारणे आहेत. तर, अतिसार होऊ नये यासाठी दारू पिणे टाळा, नियमित स्वच्छ हात धुवा, स्वच्छता राखा, ऍस्पिरिन, स्टिरॉइड्स इत्यादींचा वापर टाळा.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी)

भारतातील सर्वात धोकादायक आजारांपैकी हा एक आजार आहे. हा हृदयाशी संबंधित आजार असून ज्याचा थेट परिणाम हृदयावर होता. या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, हातपाय सुन्न पडणे, छातीत अस्वस्थ वाटणे, शरीराच्या इतर भागांमध्ये जसे की मान, पाठ, जबडा, घसा तसेच पोटाचा वरचा भाग दुखणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. तंबाखूचे जास्त सेवन, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, अयोग्य आणि अल्प आहार, आनुवंशिक कारणे, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल सारखा रोग, जादा वजन असणे आदी कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. हा आजार टाळण्यासाठी तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय राहा. नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रित ठेवा. धूम्रपानाची सवय बंद करा. तुमचं ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा. फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश असलेले निरोगी आहार घ्या.

स्ट्रोक

मेंदूतील कोणतीही धमनी ब्लॉक झाल्यास स्ट्रोक हा आजार उद्भवतो. हातपाय किंवा चेहरा सुन्न होणे, डोकेदुखी, डोळ्यांनी दिसण्यास अडचण येणे, चालण्यात अडचण, बोलण्यात अडचण ही स्ट्रोकची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोक होण्याचं प्रमाण जास्त असते. याशिवाय, मधुमेह असलेली व्यक्ती, धूम्रपानाची जास्त सवय, ब्रेन हॅमरेजची समस्या असलेल्या व्यक्ती, हृदयरोग असणऱ्या व्यक्ती यांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. स्ट्रोक होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी धूम्रपान सोडा. रक्तदाब नियंत्रणात ठेवा. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा. नियमित व्यायाम करा. दारुचं सेवन बंद करा. उच्च फायबर आणि कमी चरबीयुक्त अन्नाचा आहारात समावेश करा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने