Kailash Gorantyal ; उद्या विधानपरिषदेसाठी मतदान ; आमचे तीन-चार लोकं हे फुटणार ; काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा दावा

 

ब्यूरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींबाबत वेगवेगळे दावे अनेकांकडून केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांत अनपेक्षित अशा अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. त्यामुळे आगामी काळातदेखील अनपेक्षित घडामोडी घडताना दिसू शकतात. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पण आता आगामी काळात राज्यातील महायुतीत भूकंप होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसारत महायुतीत खरंच भूकंप झाला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या आगामी जागावाटपावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली. “मी यावर आज तर काही बोलू शकत नाही. पण उद्या महायुतीत मोठा भूकंप येईल. तुम्हाला माहिती आहे की, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार पडणार आहे. त्यानंतर आपण बोलू की, कुणाला किती जागा मिळतील. आता कुणाला किती ताकद आहे ते लोकसभा निवडणुकीत दिसली आहे. ज्याची ताकद आहे त्याला देणार”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

“हे वरतून चाललं आहे. त्यांनाही कळलं आहे. तिकीट वाटप भले इथे असेल, पण तिकीट देणारे भाजपचे केंद्रातले मोठे नेते आहेत. भाजप 160 तिकीट शंभर टक्के घेईल. तर इतर दोन पक्षांची जेवढी ताकद आहे तितक्या जागा त्यांना मिळतील. महायुतीच्या जागावाटपामुळे महाराष्ट्रात बंडखोरी जास्त होईल. कारण प्रत्येक मतदारसंघात शिंदे गटाचा माणूस तयार आहे, अजित पवार गटाचा माणूस तयार आहे, तसेच भाजपचे जुने कार्यकर्ते तयार आहेत. बंडखोरी फार मोठ्या प्रमाणात होईल”, असा मोठा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

कैलास गोरंट्याल यांचा विधान परिषद निवडणुबाबातही मोठा दावा

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुतीबाबतही कैलास गोरंट्याल यांनी उघडपणे मोठं वक्तव्य केलं आहे. “विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत”, असा धक्कादायक दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. “आमचे तीन-चार आमदार फुटणार त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे”, अशी देखील माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली.

महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने