Maharashtra : प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न, मंत्री अतुल सावे

ब्युरो टीम: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्या हस्ते काढण्यात आली. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सावे म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या  सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे मंडळाने नेमलेले देखरेख समितीचे सदस्य प्रमोद यादव, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री सावे म्हणाले, 'म्हाडाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात अनेक सदनिका उभारण्यात आल्या आहेत. म्हाडाची सोडत संपूर्ण संगणकीय प्रणालीवर आधारीत असून यात मानवी हस्तक्षेप होत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याने नागरिकांचा या सोडतीवर विश्वास वाढला आहे. म्हाडाच्या संगणकीय सोडतीला नागरिकांचा मिळणारा प्रतिसादावरून राज्यात परवडणाऱ्या दरातील घरांची गरज आणि मागणी दिसून येत आहे. सोडतीत घर न मिळालेल्यांसाठी लवकरच म्हाडातर्फे दुसरी सोडत काढण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.  

म्हाडाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  वानखेडे यांनी प्रास्ताविकात सोडतीविषयी माहिती दिली. म्हाडा पुणेतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात येत असून यासाठी ४६ हजार ५३२ अर्ज प्राप्त झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंत्री सावे यांच्या हस्ते २० टक्के सर्वसमावेशक योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांची सोडत काढण्यात आली. सोडतीत नाव आलेल्या नागरिकांचा जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. घर मिळाल्याचे समाधान व्यक्त करताना अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोडतीचा निकाल  https://mhada.gov.in  आणि  https://lottery.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच पुणे मंडळाच्या कार्यालयातदेखील दर्शविण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने