Prostate Cancer : लघवी करताना त्रास होतोय? आजच व्हा सावध



ब्युरो टीम : तुम्ही अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असाल, तर आजच सावध व्हा. कारण अशा निष्काळजीपणाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण कामाच्या व्यापात कॅन्सर सारख्या आजाराच्या प्राथमिक लक्षणाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. त्यातही आता पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. खरतर  प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमधील दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.

प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात ते गंभीर स्वरूप धारण करतात. चला तर, प्रोस्टेट कॅन्सरच्या महत्त्वाच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊ.

1) प्रोस्टेट कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवी करण्यास त्रास होणं. यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावं लागणे, लघवी करताना अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणांचा समावेश होतो.

2) वजन कमी होणं हे वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये आढळणारं लक्षण आहे. त्यामुळे वजन कमी होणे, हे प्रत्येकवेळी प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण नसते. पण जर तुमचं वजन विनाकारण कमी होत असेल, तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

3) मूत्र किंवा वीर्य यामध्ये रक्त येणं, हे प्रोस्टेट कॅन्सरचं गंभीर लक्षण आहे. तसेच हे इतर समस्यांचं लक्षण देखील असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

4) वारंवार पाठदुखीची समस्या उद्भवणे, हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण आहे. कारण जेव्हा हा कॅन्सर पसरतो, तेव्हा पाठदुखी किंवा तुमचे हिप दुखू शकतात. कधीकधी या वेदना तुमच्या पायांपर्यंत देखील वाढू शकतात. त्यामुळे अशा समस्याकडे दुर्लक्ष करू नये.

5) इजैक्‍युलेशन अर्थात वीर्य स्खलनामध्ये प्रोस्टेट महत्त्वाची भूमिका बजावते. प्रोस्टेट कॅन्सर हे इजैक्‍युलेशन प्रभावित करू शकतात. ज्यामुळे वेदना, जळजळ किंवा त्रास होतो. याव्यतिरिक्त, शुक्राणूंची संख्या देखील कमी होऊ शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने