ब्युरो टीम : पुण्यात गेल्या काही तासांमध्ये धुवाधार पाऊस झाला आहे. त्यातच हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
मुळशी धरण ७० टक्के भरले
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजता ७० टक्के क्षमतेने भरले असून आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये, आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा