Union Budget 2024 : 1950 मध्ये किती भरावा लागत होता इन्कम टॅक्स ? वाचा



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै २०२४ रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण या सादर करणार आहेत.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आणि अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे 'इन्कम टॅक्स स्लॅब'. हा अर्थसंकल्पाचा असा विषय राहिला आहे, ज्यावर प्रत्येक सामान्य नागरिकांसोबतच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची देखील नजर असते. यावेळी अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला आयकर स्लॅबमध्ये बदलाची अपेक्षा आहे. . पण तुम्हाला माहिती आहे का वर्ष 1950 मध्ये किती रुपये इन्कम टॅक्स भरावा लागत होता ? चला तर, आज याबाबतच जाणून घेऊ.

स्वातंत्र्यानंतर, भारतात प्रथमच 1949-50 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सचे दर निश्चित करण्यात आले. यापूर्वी 10 हजारांपर्यंत च्या वार्षिक उत्पन्नावर 4 पैसे टॅक्स भरावा लागत होता. नंतर हा कमी करून 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 3 पैसे करण्यात आले. तर, 10 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 1.9 आणे कर भरावा लागत होता. 1949-50 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स दर निश्चित केल्यानंतर 1,500 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागत नव्हता. या अर्थसंकल्पात 1501 ते 5000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 4.69 टक्के, 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10.94 टक्के टॅक्स भरावा लागत होता. याशिवाय, 10,001 ते 15,000 रुपये कमाई करणाऱ्यांना 21.88 टक्के दराने इन्कम टॅक्स भरावा लागत होता. 15,001 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांसाठी आयकर स्लॅब 31.25 टक्के होता. त्यानंतर वर्षानुवर्षे इन्कम टॅक्स चे नियम बदलले गेले. सध्या आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांपर्यंत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने