ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प २३ जुलै २०२४ रोजी लोकसभेत सादर होणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा हा अर्थसंकल्प आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. यंदा १ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर आता संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख १ फेब्रुवारी कशी ठरली? चला तर, आज आपण याबाबतच जाणून घेऊ.
भारताचा अर्थसंकल्प यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी सादर केला जात नव्हता. त्यापूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात होता. २०१७ सालापर्यंत हाच संकेत पाळला जात होता. मात्र, माजी दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ साली हा संकेत मोडत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी अरुण जेटली म्हणाले होते की, 'फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केल्याने सरकारला नवीन धोरणे आणि बदल १ एप्रिलपर्यंत लागू करण्यास अत्यंत कमी वेळ प्राप्त होतो, त्यामुळे अर्थसंकल्पाचे सादरीकरण १ फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' या निर्णयासह, ब्रिटीश राजवटीपासून सुरू असलेली ही प्रथा नरेंद्र मोदी सरकारने मोडीत काढली. आधी रेल्वेचे बजेटही स्वतंत्रपणे सादर केले जायचे. मात्र, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने वेगळा रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याचा नियम रद्द करून आणखी एक महत्त्वाचा बदल घडवून आणला होता.
दरम्यान, २३ जुलै रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. या अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात वेळा अर्थसंकल्प सादर करणार्या निर्मला सीतारामण या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा