ब्युरो टीम : २३ जुलै २०२४ रोजी देशाचा ९३ वा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करतील. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्प नेहमीच सकाळी सादर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, १९९९ पर्यंत अर्थसंकल्प हा सायंकाळी पाच वाजता सादर केला जात होता.
अर्थसंकल्प सायंकाळी पाच वाजता सादर करण्याची परंपरा सकाळी अकरा वाजता कशी झाली, यामागे इतिहास आहे. चला तर, आज आपण त्याबाबत जाणून घेऊ.
काय आहे इतिहास?
आपल्या देशावर इंग्रज राज्य करीत असताना सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करीत होते. लंडन आणि भारतात एकाच वेळी घोषणा केल्या जाव्यात, म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली होती. भारतीय प्रमाण वेळ ही लंडन येथील वेळेपेक्षा ४ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. त्यामुळे, भारतात संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर केल्यास लंडनमधील वेळेनुसार तो दिवसा १२.३० वाजता सादर होत होता.
इंग्रज सरकारसाठी ही वेळ सोयीची होती, त्यामुळे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर केला जायचा. सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाण्याची प्रथा भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तशीच सुरू होती.
१९९९ मध्ये मोडली प्रथा
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेमध्ये १९९९ साली बदल करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी १९९९ रोजी, अटल बिहारी वाजयेपी सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात केली. हा बदल फारच महत्त्वाचा मानला गेला. त्यानंतर १९९९ पासून आतापर्यंत सकाळी ११ वाजताच अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला आहे.
टिप्पणी पोस्ट करा