Zika virus : झिका व्हायरस नेमका काय आहे? जाणून घ्या लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय



ब्युरो टीम : पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या सात पर्यंत पोहचली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, झिका व्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? चला तर आज झिका व्हायरसची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊ. 

या डासामुळे पसरतो झिका व्हायरस

झिका व्हायरस हा एडिस डास चावल्याने पसरतो. चिकनगुनिया, येलो फिव्हर आणि डेंग्यू सारखा हा आजार पसरतो. झिका व्हायरसने बाधित असणारा डास जेव्हा निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा त्या व्यक्तीला झिका व्हायरसची लागण होऊ शकते. जगभरात या आजाराचे तुरळक रुग्ण सापडत असले तरी हा आजार आपल्यापर्यंत येऊ नये, म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

झिका व्हायरसची लक्षणं 

त्वचेवर पुरळ येणे आणि त्याला खाज येणे.

सर्दीसोबतच तापही असणे.

खूप घाम येणे. 

स्नायूंमध्ये वेदना असणे.

तीव्र डोकेदुखी आणि खूप थकवा.

भूक कमी होणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे.

अशी घ्या काळजी

- झिका आजाराची लागण डासांमुळे होते. त्यामुळे आपल्या आजुबाजुला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

- पाच दिवसांतून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी. 

- घराच्या आजुबाजुला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

- घरात मनी प्लांट, बांम्बू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती ठेवत असाल तर त्यात पाणी साचून ठेवू नका.

- डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करा. 

- अंग झाकून राहील असे कपडे घाला.

दरम्यान, झिका व्हायरसची लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात तात्काळ जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने