Ahmednagar : पुण्यातील पावसामुळे नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावांना पुराचा धोका

 


ब्युरो टीम :  पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काही गावामध्ये नदीचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेला भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पुणे- मुंबई भागातून या मार्गाने येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यात अडचण निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, भांबोरा, शिंपोरा, गणेशवाडी, खेड व नदीकाठच्या इतर गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जत पोलीस, महसूल व आपत्कालीनची पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, तहसीलदार बिराजदार यांनी सिद्धटेक येथे जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी सिद्धटेक येथील पुलावर तैनात करण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने