ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नसलं तरी वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे- प्रतिदावे केले जात आहेत. असं असतानाच महायुतीच्या गोटातून पुण्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजपचे आमदार असणाऱ्या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे. खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी अजित पवार गटाची मागणी आहे.
खडकवासला मतदार संघावर अजित पवार गटाचा दावा
खडकवासला मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवरांना 21 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत. पण आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
भीमराव तापकीर यांची प्रतिक्रिया काय?
खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्याशी आम्ही बातचित केली. तेव्हा त्यांनी त्यांची बाजू मांडली. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. खडकवासल्याची जागा कुणाला द्यायची याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. ते जे सांगतील ते मला मान्य असेल. पक्षाने मला तीन वेळा या मतदारसंघातून संधी दिली आहे. पक्षाने आता घरी बसायला सांगितलं तरी घरी बसेल. राष्ट्रवादीने दावा करण्यात काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना मिळालेल्या मताधिक्यात आम्हीही मेहनत घेतली आहे. यापूर्वी याच मतदारसंघातून कांचन कुल आणि महादेव जानकर यांनाही आम्ही लीड दिलं होतं, असं भीमराव तापकीर म्हणाले.
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना या मतदारसंघातून राष्ट्र्वादीचाच उमेदवार असावा, अशी इच्छा आहे. खडकवासल्यातून सुनेत्रा पवार यांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे अजित पवार गट इथून लढण्यास फायदा होणार असल्याचं अजित पवार गटाच्या नेत्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय घडतं? हा मतदारसंघ कुणाकडे जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा