Badlapur School Case : बदलापूर प्रकरण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं मोठं पाऊल



ब्युरो टीम : बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश त्यांनी दिले. दुसरीकडे दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकीत शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षांच्या दोन मुलींवर हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचीत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले. या तपासणीनंतर रूग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने