ब्युरो टीम : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड विधानसभा मतदारसंघात रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या महिला सफाई कर्मचारी भगिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींनी चंद्रकांत पाटील यांना राखी बांधत, 'दादांसारखा भाऊ लाभला, हे आमच्यासाठी खूप आनंदाचं आहे,' अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी सफाई काम करणाऱ्या महिला भगिनींसाठी भाऊबीज योजनेची घोषणा पाटील यांनी केली.
कार्यक्रमाला भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, कार्यक्रमाचे संयोजक महेश पवळे, राजाभाऊ बराटे, विठ्ठल अण्णा बराटे, अनुराधा एडके, दीपक पवार, राज तांबोळी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि महिला सफाई कर्मचारी भगिनींनी उपस्थित होते.
'आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. विधानसभा मतदारसंघातील सफाई कर्मचारी भगिनींनी याचा आवर्जून लाभ घ्यावा,' असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले,'रक्षा बंधन म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण आहे. कालानुरूप या सणाचे महत्त्व बदलले असून; आता बहिणीच्या प्रत्येक कामात भाऊ सोबत असल्याची भावना प्रतिपादित होते. त्यामुळे कोथरुड मधील प्रत्येक बहिणीच्या सोबत सदैव आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात सोबत असून; त्यांना अजून पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देत; यशस्वी उद्योजिका होण्यासाठी मदत केली आहे. सफाई कर्मचारी हे आपले खऱ्या अर्थाने रक्षक आहेत. कोविड काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले. आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला. त्यामुळे त्यांचे आरोग्य आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे. त्यासाठी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर सातत्याने सुरू असते. त्याचा सफाई महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी,' असे आवाहन त्यांनी केले.
कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित रहावे, यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून विशेष उपक्रम कोथरुड विधानसभा मतदारसंघात राबवित आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून सफाई काम करणाऱ्या महिलांमध्ये बचतीचे प्रमाण वाढावे; यासाठी भाऊबीज योजनेची घोषणा यावेळी त्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा