ब्युरो टीम : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पुणे शहरात नुकतीच पूरजन्य परिस्थिती उद्भवली होती. अशा परिस्थितीत स्वतःच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारात योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण पावसाळ्यात अनेक प्रकारच्या जलजन्य आजारांची समस्याही वाढते. त्यामुळे या ऋतूत स्वच्छतेची विशेष काळजी घेणं महत्त्वाचे असते. या काळात विशेषतः खाण्यात हलगर्जीपणा केल्यानं, खाण्याकडे दुर्लक्ष केल्याने फूड पॉयझनिंगसह अन्नाशी संबंधित आजार होऊ शकतात. अशावेळी पावसाळ्यात काही पदार्थांचे सेवन करणे टाळणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टिनं फायदेशीर आहे. चला तर, हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊ.
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, पनीर यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय चांगलं मानलं जातं. परंतु उन्हाळा व पावसाळ्यात ते लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत दमट हवामानात दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रकारे ठेवावेत. मार्केटमधून ताजे दुग्धजन्य पदार्थच खरेदी करावेत. या पदार्थांची एक्सपायरी डेट पाहावी. एक्सपायरीनंतर असे पदार्थ खाऊ नका.
उघड्यावरील पदार्थ
अनेकांना स्ट्रीट फूड खाणे खूप आवडते. पण पावसाळ्यात असे पदार्थ खाल्ल्यानं आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. कारण हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली गेली असेलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील हातगाडीवर मिळणारे चाट, समोसा, पुरी, भजे यांसारख्या गोष्टी खाणे तुम्ही टाळू शकता. अन्नजन्य आजार टाळण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल.
चिरलेली फळे
पावसाळ्यात कधीही जास्त काळ चिरून ठेवलेली फळे खाऊ नका. आजकाल फळे चिरून त्याच्या फोडी देखील गाडीवर विकतात. मात्र अशी फळे खाऊ नका. कारण त्या फळांवर माश्या बसतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. फळांची व्यवस्थित साठवणूक केली न गेल्यास ते दूषित होतात. त्यामुळे शक्यतो संपूर्ण फळे घरी चांगल्या प्रकारे धुवून खाणे चांगले.
टिप्पणी पोस्ट करा