Nag Panchami : नागपंचमी जवळ आलीय, जाणून घ्या या सणाचे महत्त्व


ब्युरो टीम : हिंदू दिनदर्शिकेनुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या विशेष दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. यंदा श्रावण महिन्यातील  नागपंचमी हा सण शुक्रवारी (9 ऑगस्ट 2024) रोजी आहे. चला तर, या सणाचे महत्त्व जाणून घेऊ.

श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक उपवास, व्रत- वैकल्य केली जातात. या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना मानला जातो.

म्हणून केली जाते नागदेवताची पूजा

श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना समजला जातो. नागदेवता सुद्धा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते.  नागदेवता भगवान शंकर यांच्या गळ्यात आहे, तर भगवान विष्णू हे शेषनागावरच विसावतात. नागदेवतेला पाताळ लोकचे स्वामी समजले जाते.  धार्मिक मान्यतेनुसार, नाग पंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने त्यांची कृपा कायम राहते आणि नागदेवता घराचे रक्षण करते.

काल सर्प दोष टाळण्यासाठी उपयुक्त

नाग पंचमीच्या दिवशी धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी पूजा केली जाते. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष आहे,  हा दोष टाळण्यासाठी त्या व्यक्तीने नाग पंचमीचे व्रत अवश्य करावे. त्याला या दोषापासून मुक्ती मिळते. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागदेवतेला दूध आणि साळ (भात) यांचा नैवद्य दाखवला जातो. या दिवशी सकाळीच अनेकजण ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यात दूध घेऊन ते नागाच्या चित्रासमोर ठेऊन नैवद्य दाखवतात. सुगंधी उदबत्ती लावून विधिवत धार्मिक पूजा करतात. यादिवशी नागाचे दर्शन घेणे हे अतिशय शुभ मानले जाते.  नागपंचमीच्या दिवशी गरुड देवाने तक्षक नावाच्या नागाला अभय दिले होते, तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने