Pune : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारा’साठी अर्ज करण्याचे आवाहन



ब्युरो टीम: जिल्ह्यातील ग्रंथालयांनी राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांनी ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता’ व ‘सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये आणि २५ हजार रुपये व सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन तर उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच महसुली विभागातील ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

या पुरस्कारांसाठीचे अर्ज तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रे. श्री. गोखले यांनी कळविले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने