ब्युरो टीम: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करुन त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे यांनी केले आहे.
अर्ज मंजूर झाल्यानंतरही बॅंक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करुन घ्यावे. नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्जाची सद्यस्थिती 'डिसअॅप्रुड' अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती अॅपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरुन लॉगिन करुन एडिट या ऑप्शनवरुन कागदपत्रांची त्रुटी दूर करुन अर्ज पुन्हा अपलोड करावे. ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला असेल त्यांनीदेखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडीट करुन त्रुटी दूर करावी.
अर्जाची सद्यस्थिती 'रिजेक्टेड' असे दिसल्यास अशांचे अर्ज बाद करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही, याबाबत नोंद घ्यावी, असेही श्री. गिरासे यांनी कळविले आहे
टिप्पणी पोस्ट करा