ब्युरो टीम : हिंदू पंचांगानुसार आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी विधीवत भगवान शंकराची पूजा करण्यास धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. यादिवशी शिवमंदिरांमध्ये श्री शिवलिंगाचा जलाभिषेक करणे, रुद्राभिषेक करणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. श्रावण महिन्या व्यतिरिक्त तुम्ही वर्षभर देखील शिवलिंगाची पूजा करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असल्यानं या महिन्यातील शिवपूजेचं विशेष महत्त्व आहे. शिवपुराणात तर शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व काय आहे? त्याचे काय फायदे आहेत? हे देखील सांगण्यात आलंय.
शिवलिंग पूजेचे काय आहे महत्व?
शिवपुराणानुसार भगवान शंकराने ब्रह्म देव आणि भगवान विष्णूला सांगितले होते की, लिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते खूप मोठे झाले. त्यामुळे भूतळ ‘लिंग स्थान’ या नावानं प्रसिद्ध झाले. ज्यामुळे भाविक त्याची पूजा करू शकतील, व पूजा केल्यानं हे अनंत ज्योतिस्तंभ किंवा ज्योतिर्मय लिंग खूपच लहान होईल,’ शिवपुराणात असं सांगण्यात आलं आहे की, ‘ज्योतिर्मय लिंग सर्व प्रकारचे भोग आणि मोक्ष प्रदान करण्याचे एकमेव साधन आहे. त्याचे दर्शन, स्पर्श आणि ध्यान भाविकांना जन्म-मृत्यूच्या दु:खापासून मुक्त करते. ज्या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले ते ठिकाण अरुणाचल म्हणून ओळखले जाईल, जिथे मोठी तीर्थक्षेत्रे दिसतील. तेथे मोक्ष प्राप्त होईल.’
श्रावणी सोमवारनिमित्त तुम्हीही शिवलिंगाची पूजा करत असाल, तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. कारण धार्मिकदृष्ट्या या विधीला खूप महत्त्व आहे. अर्थात यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
टिप्पणी पोस्ट करा