ब्युरो टीम : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी पराभव केला होता. त्यातच आता डॉ.सुजय विखे आगामी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याची शक्यता आहे. विखे हे संगमनेर किंवा राहुरी या दोन्हीपैकी एका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खुद्द विखे यांनीच ही माहिती दिलीय.
माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. ते संगमनेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. जनतेने ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं विखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तर, विखे विरुद्ध थोरात लढत रंगणार?
अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे आणि थोरात या दोन बड्या राजकीय प्रस्थांमधील वैर सर्वश्रुत आहे. काँग्रेसमध्ये एकत्र असतानाही एकाच जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता. पुढे विखेंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच आता डॉ.सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे आगामी विधानसभेत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा