ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. चला तर, मतदार यादीत नाव कसे शोधावे, ते जाणून घेऊ
मतदार यादीत नाव असे शोधा
ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते. ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत एक voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App या सेवा उपलब्ध आहेत. Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यूआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. voters.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस><मतदान ओळखपत्र क्रमांक>हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरुपातील मतदार यादी उपलब्ध असते. आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाऊनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता. या सोबतच आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदारयादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो. नागरिकांनी त्वरित आपले नाव तपासावे आणि आपला मताधिकार सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा