bigg boss marathi aarya slaps nikki : धक्कादायक! आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली



ब्युरो टीम : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी सध्या ‘जादुई हिरा’ मिळवण्याचा टास्क चालू आहे. या टास्कदरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशि‍लात वाजवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीसाठी अरबाज, धनंजय, वैभव, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे पाच उमेदवार पात्र ठरले होते. या पाच जणांपैकी एकाला घराचा कॅप्टन होण्याची संधी मिळणार होती. यासाठी ‘बिग बॉस’ने ‘जादुई हिरा’ हा नवीन टास्क सदस्यांना दिला होता. या टास्कमध्ये घरातील विविध भागांमध्ये पेटीत बंद करून हिरे/स्टोन ठेवण्यात आले होते. बझर वाजवल्यावर जो सदस्य सर्वात आधी हिरा उचलेल त्याला जादुई खोलीत जाऊन एका सदस्याला बाद करण्याची संधी मिळणार होती. यानुसार पहिला हिरा जान्हवीने उचलला आणि तिने अनपेक्षितपणे अरबाजला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर केलं.

दुसऱ्या फेरीत वैभवने हिरा उचलला यावेळी त्याने सुरजला या शर्यतीतून बाद केलं. आता फक्त वैभव, धनंजय आणि वर्षा या तीन सदस्यांमध्ये कॅप्टन्सीची लढत होणार होती. ‘बिग बॉस’कडून पुन्हा एकदा घराच्या विविध परिसरात जादुई पेट्या ठेवण्यात आल्या. यापैकी एक पेटी वॉशरुममध्ये होती. याठिकाणी ‘टीम बी’ने वर्षा उसगांवकरांना बसवलं होतं तर, आर्या कोणीही आत येऊ नये म्हणून वॉशरुमचा दरवाजा घट्ट धरून उभी होती. यावेळी निक्कीने अरबाजला हा दरवाजा येऊन ढकल असं सांगितलं.

निक्कीच्या सांगण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलला आणि निक्कीने वॉशरुममध्ये प्रवेश घेतला. मागोमाग जान्हवी सुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली. याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले आणि भडकलेल्या आर्याने निक्कीला कानाखाली वाजवली. यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही” असं जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती. 

दरम्यान, ‘बिग बॉस’ यावर म्हणाले, 'आर्या आणि निक्कीमध्ये जे काही घडलं ते अतिशय निंदनीय आहे आणि ‘बिग बॉस’ याप्रकरणी आर्या यांना कठोर शिक्षा सुनावणार आहेत.” त्यामुळे आता आर्याला या प्रकरणी काय शिक्षा होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने