DCM Ajit Pawar : स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम पुणेकरांच्या नावाला साजेसे, उपमुख्यमंत्री अजित पवार



ब्युरो टीम : 'पुणेकरांच्या नावाला साजेसे असे स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानकाचे काम झालेले आहे. आज जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भूमिगत रेल्वेचे लोकार्पण होत असून स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरीता मेट्रोचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येत आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने काम करण्यात येत आहे,' असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पवार बोलत होते.

'पुण्यात विविध सार्वजनिक विकासाची कामे सुरु असताना पुणेकरांना त्रास होत आहे, ही गोष्ट मान्य करतो. परंतु, आगामी ५० ते १०० वर्षाचा विकास या माध्यमातून होणार आहे,' असे सांगतानाच उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले,'भिडेवाडा येथील या ऐतिहासिक स्मारकाकरीता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन राज्य शासनाने जागा ताब्यात घेतली आहे. जागेच्या भूसंपादनाकरीता अंदाजे २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याठिकाणच्या भूसंपादनामुळे बाधितांना योग्य तो मोबदला देण्याकरीता राज्य शासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल. भिडेवाडा स्मारकाकरीता १० कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. भिडेवाडा येथील स्मारकाचे काम उत्तम व दर्जेदार होईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने