ब्युरो टीम : 'पुणे मेट्रोच्या कामाला सन २०१४ पासून गती मिळाली असून यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन करुन हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा देशातील सर्वाधिक वेगाने काम पूर्ण होणारा टप्पा म्हणून ओळखला जातो,' असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ तर टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा स्मारकाचे भूमिपूजन, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या अनुषंगाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते.
'शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान टाटा कंपनीच्या मदतीने मेट्रोचे काम करण्यात येत असून ही देशातील पहिली सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो आहे. स्वारगेट येथील मेट्रोचे स्थानक ‘मल्टिमॉडेल स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असून अशाप्रकारचे देशातील पहिले स्थानक असणार आहे. आगामी काळात मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विविध भागात मेट्रोने प्रवास करता येईल, असे नियोजन केले आहे,'असेही फडणवीस म्हणाले.
'पुणे ही समाजसुधारकांची भूमी असून येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करुन देणारे स्मारक होणे अंत्यत महत्त्वाची गोष्ट आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करुन महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षणाचा आणि समाजसुधारणेचा मिळालेल्या वारसाची आठवण करुन देणारे सुंदर असे स्मारकाचे काम सुरु होत असून ते आगामी ५०० वर्ष आपल्या प्रेरणा देत राहील,' असेही फडणवीस यांनी सांगितले.
पुणे हे राज्याचे आर्थिक मॅग्नेट
पुणे ही सांस्कृतिक, तंत्रज्ञानाची राजधानी आहेच त्याचबरोबर पुणे हे आर्थिक 'मॅग्नेट' आहे. पुणे शहर व परिसरात सुमारे १ लाख कोटी रुपयांची कामे करीत आहोत. राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन हे पुणे जिल्हा असून दुसरे आता छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात विविध प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा