ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराज हे महान वैश्विक विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते, असे सांगतानाच, जगभरात विशेषत: अमेरिकेसारख्या मोठ्या देशात महाराष्ट्राचे सण व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
अमेरिकेत स्थायिक झालेले विजय पाटील हे “छत्रपती शिवाजी महाराज : अमेरिका परिवार” या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील २२० देशात व २५० शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि शौर्याची ओळख करून देत आहेत. विजय पाटील गेली पंचवीस वर्षे अमेरिकेतील लाँस ऐन्जिलस या शहरात वास्तव्यास आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम साजरा केला होता. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि शिवरायांचे शौर्य व त्यांची गाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली जाते.
या निमित्ताने विजय पाटील यांनी एका ग्रंथाचे प्रकाशन केले होते. या ग्रंथाची प्रत पाटील यांनी उपसभापती डॉ गोऱ्हे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना भेट दिली.
डॉ गोऱ्हे यांनी विजय पाटील यांच्या या अनोख्या व गौरवास्पद कार्याचे कौतुक केले. मुलींच्या सक्षमीकरणासाठीही विजय पाटील यांनी काम करावे, अशी सूचना केली. तर विजय पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे मंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेची, त्यांची युद्धनीती याचा अभ्यास होणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे ही आज काळाची गरज आहे, असे मत डॉ गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा