journalist : डिझिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी

 


ब्युरो टीम : ‘डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटछोटे विषय मांडत आहेत. प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे. आगामी काळात हा मीडिया अजूनच व्यापक होणार आहे. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका आणि सरकारी जाहिराती देण्यात याव्यात,' अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत देशमुख बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे शरद पाबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे  राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे,  राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव, विविध जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते. 

‘आजची कार्यशाळा ही ३०० पत्रकारांसाठी मर्यादित होती. परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे 400 पेक्षा जास्त पत्रकार आले आहेत. आगामी काळात अशा कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागात  घेण्यात येणार असल्याचेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशमुख पुढे म्हणाले, ‘डिझिटल माध्यमांकडे तरुण पत्रकारांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून परिषदेने डिजिटल मीडिया परिषदेची सुरुवात केली आहे. काळानुसार बदलणे ही भूमिका कायमच परिषदेची राहिली आहे. डिझिटलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमुळे आज ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्नही सहज समोर येऊ लागले आहेत. डिजिटल माध्यमात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन केले, असेही त्यांनी सांगितले.

‘डिजिटल मीडियाला सरकारकडून जाहिराती मिळाव्यात, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करीत आहे. त्यामुळेच हळूहळू सरकारकडून डिजिटल माध्यमांना जाहिराती देण्याचे काम सुरू झाले. पण ग्रामीण भागामध्ये देखील अशा जाहिराती मिळाव्यात, यासाठी परिषदेचा लढा सुरूच राहिली,’ असेही देशमुख म्हणाले. 

साप्ताहिकांनी डिजिटलमध्ये उतरणे काळाची गरज

‘ग्रामीण भागातील साप्ताहिक असतील, छोटी वर्तमान पत्रे असतील यांनी आताच काळाची पावले ओळखून डिजिटलमध्ये उतरण्याची गरज आहे. साप्ताहिकासोबतच या माध्यम देखील त्यांनी चालवावे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते गरजेचे आहे,’ असे आवाहनही देशमुख यांनी केले. 

विविध तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

डिजिटल मिडिया परिषदेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लखनऊ येथील न्यूज 4 पीएम चे संपादक संजय शर्मा यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत ज्येष्ठ विधिज्ञ आसिम सरोदे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर प्राचार्य गायकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप चव्हाण तसेच स्वाती घोसाळकर यांचा आणि टीव्हीजेएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उदय जाधव यांचा एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने