Maharashtra Assembly Election : राज्यात २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, निवडणूक आयोगाचे संकेत


ब्युरो टीम : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी शनिवारी (२८ सप्टेंबर २०२४) रोजी पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत कशी तयारी करण्यात आली आहे, याची माहिती दिली.

यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआ या दोन्ही आघाड्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभू्मीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेत सर्वकाही स्पष्ट केलं आहे. 

राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांकडून खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात, तसेच काही वस्तूंचे दर कमी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. मात्र, खर्चाची मर्यादा ही देशपातळीवर एकच ठरवण्यात आलेली असते, तसेच वस्तूंचे दरही महागाई निर्देशांकानुसारच ठरवलेले असतात. त्यामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने