Maharashtra vidhansabha election : आम्ही मतदान करणारच, चार हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी घेतली शपथ


ब्युरो टीम: पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रनथॅान' कार्यक्रमात ४ हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या ठिकाणी 'रनथॅान' चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगर पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, रनथाॅनचे संचालक केशव मानगे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, किरण मोरे, मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे,कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

मतदान जनजागृती कार्यक्रमात तरूणांचा मोठा उत्साह

रनथॅान कार्यक्रमात सहभागी झालेल्या धावपटू, सायकलपटूंनी स्वयंस्फूर्तीने मतदान जागृतीचे फलक धरले होते तसेच त्यांनी सेल्फीही काढले आणि येणाऱ्या निवडणूकीत मतदानासह मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्यावचीही तयारी दर्शविली. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आजच्या कार्यक्रमात मतदार यादी नाव नोंदणी करणे, नाव तपासणे, नावात दुरूस्ती करणे यासाठी फ्लेक्सद्वारे प्रचार करण्यात आला.

घोषवाक्यांद्वारे मतदान जनजागृती

'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…!', 'जना-मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे…!', 'आपले अमूल्य मत,करेल लोकशाही मजबूत…!' आदी मजकुराचे मतदान जनजागृतीच्या हस्तफलकांद्वारे अधिकारी, खेळाडू तसेच उपस्थित सायकलपटूंनी जनजागृती केली.

यावेळी रोटरी क्लब सदस्य डाॅ.रविंद्र कदम, शशांक फडके, माजी सैनिक, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने