minister suresh khade : कामगार मंत्र्यांचे घरेलू कामगारांना महत्त्वाचे आवाहन, म्हणाले...

 


ब्युरो टीम : कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ १ रुपयांमध्ये  नोंदणी करता येत असून या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी नोंदणी करावी असे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. 

चिंचवड येथे रामकृष्ण मोरे नाट्यगृहात  आयोजित नोंदीत घरेलू कामगारांना गृहउपयोगी वस्तुसंच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे,  अमित गोरखे,  कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उप आयुक्त अभय गिते, सदाशिव खाडे, घरेलू कामगार विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, घरेलू कामगारांना या गृहोपयोगी वस्तूसंचाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली असून मंडळामार्फत घरेलू कामगार महिलांना दोन अपत्यापर्यंत ५ हजार रुपये प्रसुती लाभ, सन्मानधन योजनेत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना १० हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. तसेच संसार उपयोगी भांडी, अंत्यविधीसाठी वारसास २ हजार रुपये सहाय्य देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

बांधकाम कामगारांनाही विविध लाभ देण्यात येतात. कामगारांची नोंदणी सुलभतेने होण्यासाठी नुकतेच तालुकास्तरावर ३०४ सेतू केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासन सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असून योजनांच्या माध्यमातून शासन आपल्या घरापर्यंत पोहोचले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती सिंघल म्हणाल्या, घरेलू कामगारांना हक्काच घरं, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, महिलांच्या आरोग्याची काळजी तसेच घरेलू कामगारांना पेन्शनची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणीसाठी प्रेरित करावे. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना लाभ देणे शक्य होईल. मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी नोंदणीचे नुतनीकरण आवश्यक असल्याचे सांगून हे शासन लोकाभिमूख असून कामगारांना मदतीचा हात देत आहे असे त्या म्हणाल्या.

कामगार मंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील १ हजार ८२० घरेलू महिला कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंचाचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार उमा खापरे व अमित गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात शैलेंद्र पोळ यांनी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने