ब्युरो टीम : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात साकार होत असलेल्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे भारताला जगातील सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनवण्याच्या दृष्टीने नवीन विमानतळे, नवे हवाई रस्ते निर्माण करण्याचे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा श्वाश्वत विकास करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथे २९ देशांच्या नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचा सहभाग असलेल्या आशिया-पॅसिफिक नागरी हवाई वाहतूक परिषदेच्या सत्रात केंद्रीय मंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी २९ देशाच्या नागरी हवाई वाहतूक मंत्र्यासह केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेचे अध्यक्ष साल्वाटोर स्कियाचितानो आदी उपस्थित होते.
या परिषदेत भारताच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली असता ते भारताच्या वतीने भूमिका मांडत होते. या परिषदेस, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया समवेत जगभरातील २९ देशांचे विमान वाहतूक मंत्री, राजदूत व अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला,
भारत लवकरच नागरी हवाई क्षेत्रात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ होईल, असा दावा करत मोहोळ पुढे म्हणाले, ‘नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढवणे हे भारत सरकारचे धोरण आहे. याच अनुषंगाने २०२५ पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत एकूण मनुष्यबळात २५% वाटा महिलांचा असावा हे आमचे ध्येय आहे. तसेच विमानन क्षेत्रास पर्यावरणपूरक बनविण्यासाठी विमान इंधनात शाश्वत पर्याय उपलब्ध केले जाणार असून नवी विमानतळे पूर्णतः पर्यावरपूरक उभारली जात आहेत.’
‘गेल्या १० वर्षांत प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हवाई सेवांमध्ये झालेली कमालीची प्रगती झाली असून विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान मोठे असणार आहे. तसेच उडान योजनेमुळे सर्वसामान्यांनाही विमानसेवा उपलब्ध होत असून डीजी यात्रा सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सहज होत आहे', असेही मोहोळ म्हणाले.
मोहोळांना मिळाली भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी !
आशिया-पॅसिफिक या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना मिळाली. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच जागतिक परिषदेत मोहोळ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पुण्यासाठी ही निश्तितच गौरवाची बाब आहे.
टिप्पणी पोस्ट करा