Pitru Paksha : ‘या’ ठिकाणी घरात चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो, अन्यथा...



ब्युरो टीम : सध्या पितृ पक्ष सुरू आहे. पितृ पक्षात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी, तर्पण आणि पिंड दान केलं जातं. या पक्षात पूर्वजांच्या फोटोची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावण्याचे नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचे पालन करूनच घरामध्ये पूर्वजांचा फोटो लावावा, अन्यथा तुमचे जीवन संकटांनी घेरलं जाऊ शकते. 

पूर्वजांच्या मृत्यूनंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेकजण त्यांच्या पूर्वजांचे फोटो घरी ठेवतात. पण घरामध्ये असे फोटो लावण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. चला तर, हे नियम नेमके काय आहेत, ते जाणून घेऊ.

देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नका

अनेकजण पूजेच्या ठिकाणी अर्थात देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवतात. पण शास्त्रात पितरांचं स्थान जरी उच्च मानलं गेलं असले, तरी पितरांचे आणि देवांचे स्थान वेगळं आहे. त्यामुळे देवघरात पूर्वजांचा फोटो ठेवल्यानं त्या व्यक्तीला जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो.

जिवंत व्यक्तीच्या फोटोसोबत पूर्वजांचा फोटो लावू नका

वास्तुनुसार  जिवंत व्यक्तीच्या फोटोसोबत पूर्वजांचा फोटो लावू नये. शास्त्रानुसार असं केल्यानं जिवंत व्यक्तीचं आयुष्य कमी होतं.

कोणत्या दिशेला पूर्वजांचा फोटो लावावा?

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो नेहमी उत्तर दिशेच्या भिंतींवर लावावा. शास्त्रात दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली आहे. त्यामुळे उत्तर दिशेला फोटो लावल्यास फोटोचे तोंड दक्षिणेकडे होतं. असं केल्यानं घरात सुख-समृद्धी येते, असं मानलं जातं.

स्वयंपाकघरात पूर्वजांचा फोटो नको

वास्तूनुसार बेडरूममध्ये, घराच्या मध्यभागी आणि स्वयंपाकघरात पूर्वजांचा फोटो लावू नये. असं केल्यानं घरातील कलह आणि घरातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होतो, असं म्हटलं जातं.

पूर्वजांचा फोटो टांगू नका

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूर्वजांचे फोटो भिंतीला टांगू नयेत. त्यापेक्षा ते नेहमी लाकडी स्टँडवर ठेवावेत.

जास्त फोटो लावू नका

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पूर्वजांचे जास्त फोटो लावणे टाळावे. यासोबतच पूर्वजांचे फोटो प्रत्येकाला दिसतील, अशा ठिकाणी लावू नये. असं म्हणतात की, मृत व्यक्तीचा फोटो पाहिल्यानं नकारात्मक ऊर्जा पसरते.

दरम्यान, ज्योतिषशास्त्रचा एक भाग वास्तुशास्त्र असून यामध्ये घरात सुख, शांती, समृद्धी रहावी, यासाठी विविध उपाय सांगितले आहेत.  अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने