Pitrupaksha : पितृपक्षात 'या'झाडांचे रोपण केल्यानं पितरांना मिळेल मुक्ती



ब्युरो टीम : गणरायाला भक्तीपूर्ण वातावरण मंगळवारी (१७ सप्टेंबर २०२४) निरोप देण्यात आला आहे. आता पितृ पक्ष सुरू झाला असून पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृपक्षात काही वृक्षांचे रोपण करणे हे खूप शुभ मानलं जातं.

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. आता पितृपक्ष सुरू झाला असून याकाळात काही झाडांचे रोपण करणे शुभ मानलं जातं. कारण वनस्पतींमध्येही प्राण असतो, व त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा जाणवत असते, असं मानलं जातं. तसेच पूर्वज हे वनस्पतींमध्येही असतात. त्यामुळेच पितृपक्षाला झाडे लावली किंवा त्यांची पूजा केली, तर पूर्वज देखील प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे. चला तर, पितृपक्षात नेमकी कोणती झाडे लावली पाहिजेत, हे जाणून घेऊ.

बेल

पितृपक्षात बेलाचे झाड लावले तर अतृप्त आत्म्याला शांती मिळते. अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला बेलपत्र आणि गंगाजल अर्पण केल्यानं सर्व पितरांना मुक्ती मिळते, अशी ही मान्यता आहे.

अशोक

जिथे अशोकाचे झाड आहे तिथे शोक अर्थात दुःख नसते, असं म्हटलं जातं. घराच्या मुख्य दरवाजावर अशोकाचे झाड लावल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही.

तुळस

तुळशीचे एक पान हे वैकुंठापर्यंत पोहोचवू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. अंत्यसंस्कारानंतर त्या जागी तुळशीचे रोप लावण्यात येते. पितृपक्षात तुळशीचे रोप लावून त्याची काळजी घेतली, तर पितरांना निश्चितच मुक्ती मिळते. पितृपक्षात तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घातल्यास पितरांना समाधान मिळते. घरात तुळशीचे रोप लावून ते वाढवले, तर घरात अकाली मृत्यू होण्याची शक्यता नसते.

पितृपक्षात काही झाडांचे रोपण करणे शुभ मानलं जात असले तरी  यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने