Pune : शिवाजीनगरमध्ये बॅनरयुद्ध की भाजपमधली अंतर्गत खदखद?

 


ब्युरो टीम :छत्रपती शिवाजीनगरमध्ये सध्या चर्चा आहे ती एका बॅनरयुद्धाची. झाले असे की नुकताच महाराष्ट्र विधानसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही सदस्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यात शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना 'उत्कृष्ट भाषणपटू' हा पुरस्कार देण्यात आला. स्वाभाविकच आहे की त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात सगळीकडे अभिनंदनाचे बॅनर लावले. त्यावर 'आमचा आमदार...वक्ता दमदार' अशी लाईन आहे. परंतु विशेष म्हणजे त्या बॅनरखालीच यावर तीव्र आक्षेप नोंदवणारे बॅनर रातोरात झळकले. त्या बॅनरवर 'व्वारे भाषणपटू!' अशा आशयाची लाईन आहे. त्यातील मजकुरानुसार 'मतदारसंघाला समस्यांचा साज आणि आमदार फक्त भाषणबाज' असा उपरोधक टोला लगावला आहे. अशाच आशयाचे अनेक बॅनर लागले आहेत जिथे कचरा समस्या, वाहतुकीचा प्रश्न असे चित्र रेखाटले आहे. हे बॅनर लागताच आता चर्चाना उधाण आले आहे.


नेमके हे बॅनर लावले कुणी? एक सरळ सोपा अंदाज म्हणजे महाविकास आघाडीतील कुणी विरोधकाने हे बॅनर लावलेत का? असा एक मतप्रवाह आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदाराची निष्क्रियता उघड करण्यासाठी बॅनरचे हत्यार विरोधक उपसू शकतात. परंतु दुसरी चर्चा अशीही आहे की भाजपातील कुणी तरी अंतर्गत विरोध दर्शवण्यासाठी तर हे बॅनर लावले नसतील का? हा विषय खऱ्या अर्थाने विचारात घेण्यासारखा आहे. असे होणे शक्य आहे. याचे कारण असे आहे कि गेल्या पाच वर्षात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची कामगिरी सुमार असल्याने इथे पक्षाने दुसऱ्या सक्षम उमेदवाराचा विचार करायला हवा असा एक मतप्रवाह पुणे भाजपमध्ये असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे हे तसे काठावर पास झाले होते. अतिशय कमी फरकाने त्यांनी विजय मिळवला होता. याशिवाय अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पण शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला मिळालेल्या आघाडीतही लक्षणीय घट झालेली दिसून आली आहे. त्यामुळेच इथे उमेदवार बदला असा आग्रह भाजपमध्ये अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. 


गेली चार वर्ष नऊ महिने कुणी कामासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांना भेटले की ते सांगायचे की आता सिद्धू सगळे बघतो मला लक्ष घालण्याची गरज पडत नाही. मात्र अलीकडील काळात अनिल शिरोळे पण नागरिकांच्या समस्या सोडवताना सक्रिय झाल्याचे दिसते. हे विद्यमान आमदाराच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे असे असंतुष्टांचा हा गट मानतो. त्याच बरोबर सध्या भाजपचा एक पदाधिकारी जो महानगरपालिकेचा माजी सदस्य आहे याच्या वाढदिवसाच्या बॅनरवर फोटोमागे विधानसभेचे चित्र झळकत आहे. त्यातूनही ही दुफळी अधोरेखित होते. त्याचीच प्रतिक्रिया या बॅनरयुद्धात उमटल्याची चर्चा आहे. असे असेल तर भाजप नेतृत्वाने याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असा मतप्रवाह आहे. असो या बॅनरयुद्धामुळे शिवाजीनगर मतदारसंघात भाजपमध्ये काही आलबेल नाही हे मात्र उघड झाले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने