swachhata din :स्वच्छता ही सवय व्हावी हाच जागतिक स्वच्छता दिनाचा संदेश



ब्युरो टीम : जागतिक पातळीवर स्वच्छतेचे महत्त्व रूजविण्यासाठी २० सप्टेंबर हा दिवस जागतिक स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ८ डिसेंबर २०२३ रोजी आपल्या ७८ व्या सत्रात एकमताने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. शाश्वत विकासाच्या दृष्टीने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी त्रोम्सो, नॉर्वे येथे मुख्य कार्यक्रम होत असून सागरी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत २०२४ च्या अहवालानुसार जगभरातील शहरी भागात दररोज २ बिलीयन टन घनकचरा तयार होतो. याशिवाय कृषी, बांधकाम, उद्योग, व्यवसाय आणि आरोग्य क्षेत्रातही कचऱ्याची निर्मिती होत असते. या कचऱ्यापैकी हानीकारक रासायनिक कचरा, ई-कचरा, प्लास्टिक, टेक्स्टाईल, अन्नपदार्थ आणि नादुरुस्त वाहनांचा कचरा अधिक चिंतेची बाब आहे. समुद्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या टाकला जाणारा कचरा सागरी जीवांसाठी धोकादायक आहे. सागरी प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ सागरी जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

कचऱ्याची वाहतूक, प्रक्रिया आणि कचरा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड आणि अन्य हानीकारक वायू तयार होऊन वायू प्रदूषण होत असल्याने ते पर्यावरण बदलाला करणीभूत ठरतात. कचऱ्यातील हानीकारक रासायनिक पदार्थ माती, हवा आणि पाण्यात मिसळल्याने ते पर्यावरणासाठी धोका उत्पन्न करतात, जैवविविधतेवर परिणाम करतात, मानवाच्या अन्नसाखळीतही प्रवेश करतात. एकूणच मानवी जीवनासाठी ही बाब हानीकारक ठरते. दरवर्षी ४ ते १० लाख व्यक्तींचा मृत्यू योग्य व्यवस्थापन न झालेल्या कचऱ्याशी निगडीत आजारांमुळे होतो.

भूतलावरील कचरा कमी करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे हा एक उपाय असू शकतो. मात्र कचरा व्यवस्थापनाचे उद्दीष्ट कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रतिबंध करणे आहे. प्रक्रियेसाठी आवश्यक कचरा त्या स्वरुपात एकत्रित करणे, त्याची वाहतूक, प्रक्रिया, प्रक्रिया करतांना ऊर्जेचा उपयोग, त्यासाठीचे तंत्रज्ञान आदी बाबींसाठी मोठ्या प्रमाणात साधनस्रोत आवश्यक असतात.  त्यामुळे किमान प्रमाणात कचरा होईल यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भारतातही स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातूमन स्वच्छतेसाठी चांगले प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यात ग्राम स्वच्छता अभियानावरही भर देण्यात येत आहेत. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'स्वच्छता ही सेवा' उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या सभोवतालचे पर्यावरण आपल्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनावर परिणाम करणारे असते. त्यामुळे या उपक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.

या उपक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक केंद्र, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले स्वच्छ करण्यासाठी एक दिवस श्रमदानात नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. 

कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग तेवढाच महत्वाचा ठरतो. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरणे, खाद्यपदार्थांचे नुकसान टाळणे, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, हानीकारक कचरा वेगळा करणे, कचरा न जाळणे, कागदाचा जपून उपयोग करणे, वृक्षारोपणाचे उपक्रम राबविणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे अशा सवयींद्वारे आपणही या प्रयत्नात मोलाचे योगदान देऊ शकतो.

सागरी किनाऱ्यांवर पर्यटनाला जातांना किमान कचरा करणे आणि तो कचराकुंडीत टाकणे गरजेचे आहे. कारण हाच कचरा सागरी जीवांसाठी हानीकारक असतो. गटारातून हानीकारक पदार्थ प्रक्रियेशिवाय नदी-नाल्यात जाणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. गड-किल्ले, पुरातन स्मारके, नद्या, सरोवरे आपले वैभव असल्याने हा परिसर सुंदर व स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून संपत्तीची निर्मितीही शक्य आहे. ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत तयार करता येईल. सुक्या कचऱ्यातील प्रक्रिया‌ योग्य घटक वेगळे केल्यास उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल. सांडपाण्यावर प्रक्रीया करून शेती आणि उद्योगासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल. शोषखड्ड्यांचा उपयोग करून गावात स्वच्छता ठेवण्यासोबत भूजल पातळी वाढविण्यासाठीही मदत होईल. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास जागतिक स्तरावर १५ ते २५ टक्के दुषीत वायूंचे (हरितगृह वायू) उत्सर्जन टाळता येईल. 

निसर्गात सर्वत्र संतुलन आढळते. मानवी हस्तक्षेपामुळे हे संतुलन ढासळत असून त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी जीवनावर पडतो आहे आणि याचाच एक भाग म्हणजे कचरा व्यवस्थापनाची समस्या आणि पर्यावरणाचे प्रदूषण आहे. वेळीच आपण स्वच्छता हा सवयीचा भाग केला नाही तर येत्या काळात आरोग्याचे आणि नैसर्गिक साधनस्रोतांचे गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे वेळीच लक्ष देऊन कचरा निर्मितीवर नियंत्रण आणि तयार झालेल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर अपेक्षित आहे. जागतिक स्वच्छता दिन हाच संदेश आपल्याला देतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने