डॉ.किरण मोघे, नगर : पर्यटन हे जगातील महत्त्वाचे आर्थिक क्षेत्र आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक दहा व्यक्तींमागे एकाचा रोजगार हा पर्यटनावर अवलंबून आहे. जागतिक स्तरावर मानवाच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यटन महत्त्वाचे ठरू शकते. वर्ल्ड ट्रॅव्हल ॲण्ड टूरीझम डेव्हलपमेंट इन्डेक्स अहवालात पर्यटनाशी संबंधित विविध पैलूंवर विचार करण्यात आला आहे. मात्र बहुतांशी ही बाजू आर्थिक आहे, त्यापलीकडे जावून वैश्विक समाजाला एकत्र आणण्याच्या पर्यटनाच्या महत्त्वाच्या भूमिकेचाही विचार करणे गरजेचे आहे.
मात्र त्यासोबतच जागतिक शांतता आणि परस्पर संबंध दृढ करण्यासाठी पर्यटन महत्त्वाचे साधन आहे. पर्यटनाच्या माध्यमातून परस्पर सामंजस्य निर्माण होते, सकारात्मक संवाद होतो आणि हीच बाब शांतता प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरते. लोकांनी लोकांसाठी चालविलेला हा व्यवसाय रुढी - परंपरांना आव्हान देत नवे संबंध प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हीच बाब जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिन ‘पर्यटन आणि शांतता’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे.
शाश्वत पर्यटनामुळे रोजगाराची निर्मिती होते आणि ते सामाजिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरते. संस्कृती आणि नैसर्गिक संपदेच्या रक्षणात पर्यटनाची महत्त्वाची भूमिका आहे. शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी ही बाब उपयुक्त ठरते. परदेशी पर्यटन भारतातील धार्मिक स्थळांना भेटी देतात, विविध सण - उत्सवात सहभागी होतात, विविध प्रकारच्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेतात. तात्पर्य, ते काही काळासाठी आपल्यात मिसळून जातात, भारतीय समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. हीच बाब भारतीय पर्यटक परदेशात गेला की अनुभवयाला मिळते. देश आणि राज्यांच्या सीमांच्या पलीकडे एक नवे नाते यामुळे निर्माण होत असते.
पर्यटन नवकल्पना आणि नावीन्यतेला समोर आणत असते, त्यातून नव्या व्यवसायांची निर्मिती होते. कोकणात ‘ट्री हाऊस’ सारखी संकल्पना वापरून पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न पहायला मिळतात. जिल्ह्यात कृषी पर्यटनातही नवे प्रयोग होत आहेत. काही ठिकाणी तेथील स्थानिक खाद्य, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे पर्यटनाला चालना देण्यात येते. नव्या सृजनाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. त्यातून आर्थिक स्थैर्य, शाश्वत विकास आणि परिणामत: शांततेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास चालना मिळते. युवकांमध्ये असलेल्या सर्जनशिलतेचा आणि ऊर्जेचा उपयोग करून पर्यटन क्षेत्रात असे अनुकूल बदल घडवून आणता येतील.
सांस्कृतिक स्तरावरील शांततेचा विचार करता पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यातील सुसंवाद महत्त्वाचा असतो. दोन्ही बाजूने एक समान पातळीवर विचार झाल्यास एकमेकांना समजून घेता येते आणि त्यातून चांगले संबंध दृढ होतात. एखाद्या ठिकाणी पर्यटकांना वारंवार जावेसे वाटणे हा तेथील पर्यटन व्यावसायिकांच्या उत्तम संवाद कौशल्य आणि सामंजस्यपूर्ण भूमिकेचे एकप्रकारे यश असते. शिवाय भिन्न संस्कृतीच्या व्यक्ती समोर आल्यावर एकत्वाची भावनाच त्यांच्यात परिणामकारक संवाद घडवून आणू शकते.
अतिथ्यशिलता हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारतात येणारा पर्यटक एखाद्या कुटुंबात वावरल्यासारखा पर्यटनाचा आनंद घेत असतो. मात्र, इथे येणाऱ्या पर्यटकाला त्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवता येईल, समस्यांचा सामना करावा लागणार नाही, त्याची फसवणूक होणार नाही, त्याला प्रत्येक क्षणी सुरक्षित असल्याचा अनुभव येईल असे वातावरण देणे ही आपली जबाबदारी आहे. पर्यटन व्यवसायाचा विस्तार आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
देशाची सीमा ओलांडून जाणारा पर्यटक एकप्रकारे त्या देशाचा सांस्कृतिक दूत किंवा शांतता दूत म्हणून दुसऱ्या देशात जात असतो. पर्यटनाच्या माध्यमातून अशा भिन्न संस्कृतीचे आदान प्रदान होत असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची संधी असते. पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्र येऊन या संधीचे सोने कसे करता येईल आणि परस्पर सहकार्यातून पर्यटन व्यवसाय हा विविध सीमा, संस्कृती, भाषा यांना जोडणारा दूवा कसा होईल याचा विचार पर्यटन दिनाच्या निमित्ताने केल्यास हा व्यवसाय वाढण्यासोबत पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक शांततेचे उद्दिष्टाकडे सकारात्मक वाटचाल करण्यास मदतच होईल.
पहिला जागतिक पर्यटन दिन कधी साजरा झाला?
संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. स्थापनेचा दहावा वर्धापन दिन साजरा करतांना १९८० मध्ये स्पेन येथे पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष साजरे करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आतापर्यंत पर्यटन आणि हरित गुंतवणूक, पर्यटन आणि समावेशक विचार, पर्यटन आणि रोजगार, पर्यटन आणि सामाजिक विकास अशा विविध ४४ संकल्पनांबाबत जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणली गेली.
(लेखक हे अहमदनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)
टिप्पणी पोस्ट करा