baba siddique : बाबा सिद्दीकी प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती, म्हणाले...



ब्युरो टीम : 'बाबा सिद्दीकी आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणातले दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यातले काही अँगल्सही आम्ही तपासत आहोत. पोलीस याबाबतची योग्य ती माहिती माध्यमांना देतील,' असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची  मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान हत्या करण्यात आली. सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली होती. आता आज, रविवारी त्यांनी याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधला.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर  शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले,'मला असं वाटतं की, त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचं असेल आणि बोलायचं असेल तर त्यांनी ते बोलावं.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने