ब्युरो टीम : करवा चौथ उत्सव नुकताच पार पडला आहे. बॉलिवूडच्या एखाद्या तरी चित्रपटात तुम्ही करवा चौथ व्रतचं दृश्य पाहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे करवा चौथमुळे बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांचे प्राण वाचले होते. स्वतः जितेंद्र यांनी एका शो मध्ये हा किस्सा सांगितला होता.
करवा चौथच्या दिवशी जितेंद्रच्या पत्नीनं केलेल्या हट्टयामुळे त्यांचे आयुष्य वाढले. आता तुम्ही याला करवा चौथची शक्ती मानू शकता किंवा एक योगायोग. पण करवा चौथमुळे जितेंद्र हे एका जीवघेण्या अपघातातून वाचले होते. नेमका हा प्रकार काय आहे, याबद्दल खुद्द जितेंद्र यांनी एका शोमध्ये सांगितले होते. नुकतेच करवा चौथ झाले असून यानिमित्ताने पुन्हा एकदा जितेंद्र यांचा किस्सा चर्चेत आला आहे.
नेमकं काय घडलं होतं.?
जितेंद्र यांनी एका टीव्ही शो मध्ये बोलताना त्यांचा जीव पत्नीमुळे कसा वाचला, हे सांगितलं होतं. ते म्हणाले होते, ‘एकदा मला रामनायडूच्या शूटिंगसाठी चेन्नईला जावं लागणार होतं. ही गोष्ट मी घरी सांगितल्यावर पत्नी शोभानं करवा चौथचा मुहूर्त असून तिचं व्रत असल्याची आठवण करून दिली, व पूजेसाठी रात्री घरीच थांबण्याचा आग्रह केला. मात्र मी शोभाला माझे जाणं खूप महत्त्वाचं असल्याचं समजवून सांगितलं. मी जर गेलो नाही, तर मोठं नुकसान होऊ शकते, असंही सांगितलं. हे ऐकून माझ्या शोभासमोर गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. मी तिला सोडून विमानतळाकडे रवाना झालो. तेथून माझे चेन्नईसाठीचे विमान संध्याकाळी सात वाजता निघणार होते. पण तेथे काही वेळानं विमानाची उड्डाणाची वेळ उशीरा झाल्याचं समजल्यानं मी घरी जाऊन करवा चौथची पूजा करण्याचा निर्णय घेतला.’
जितेंद्र घरी पोहोचल्यावर त्यांची पत्नी शोभानं करवा चौथची पूजा असल्यामुळे त्यांना पुन्हा जाऊ देणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पत्नीच्या आग्रहामुळे ते घरीच थांबले. रात्री उशिरा ते पाली हिल्स येथील त्यांच्या घराच्या गॅलरीत उभे होते, तेव्हा त्यांना एक आगीचा गोळा हवेत तरंगत असल्याचं दिसला. काही वेळातच त्यांना एक फोन आला, व ते ज्या विमानानं चेन्नईला जाणार होते ते विमान क्रॅश झालं असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. म्हणजेच जितेंद्र यांना हवेत तरंगत असताना जो आगीचा गोळा दिसत होता, ते प्रत्यक्षात क्रॅश झालेलं विमान होतं. या विमानातील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यादिवशी पत्नीचा आग्रह हा जितेंद्र यांच्यासाठी त्यांचा जीव वाचवणारा ठरला.
खरतर भारतीय संस्कृतीमध्ये रूढी परंपरा सण-वार आणि आचार विचाराला खूप महत्त्व आहे. असाच एक पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासाला जोडणारा सण म्हणजे करवा चौथ. पती-पत्नीच्या अतूट आणि अपार प्रेमाला दर्शविणारा हा सण आहे. याच करवा चौथमुळे अभिनेता जितेंद्र यांचे प्राण वाचले होते. स्वतः जितेंद्र यांनी एका शो मध्ये हा किस्सा सांगितला होता.
टिप्पणी पोस्ट करा