Chandrakant Patil :गौरी सजावट स्पर्धेचा अभूतपूर्व प्रतिसाद आनंददायी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य



ब्युरो टीम : 'कोथरूड मतदारसंघातील महिलांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला, ' अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

मंत्री पाटील यांच्या सहयोगातून कोथरूड मतदारसंघात आयोजित गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, आयोजिका कांचन कुंबरे, प्रा. डॉ. अनुराधा एडके, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, मयूरी कोकाटे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'गणेशोत्सव हा आनंदाचा सोहळा आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रथमच कोथरुड मतदारसंघात गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील सहभागी महिलांना गौरी सजावटीसाठी भरजरी साडी देखील दिली होती‌. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता‌.‌ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. महिलांचा स्पर्धेतील उत्साह पाहून अतिशय आनंद होतो,' अशी भावना यावेळी व्यक्त केली. 

या स्पर्धेत मंजिरी मारणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सुमन शेलार यांनी तर तृतीय क्रमांक सुवर्णा बालवडकर यांनी पटकाविला. तर ५० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने