ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. भाजपने रविवारी (२० ऑक्टोबर) ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये कर्जत जामखेडमध्ये पुन्हाप्रा. राम शिंदेंना संधी देण्यात आली. तर, या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना उमेदवारी दिली जाईल, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध शिंदे अशी लढत होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ल्या समजला जातो. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीनं मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. पवार यांनी तब्बल ४३ हजार ३४७ मतांनी शिंदे यांचा पराभव करीत २५ वर्षापासून भाजपची सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड या बालेकिल्ल्याला एकप्रकारे सुरुंग लावला होता. रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मतं मिळाली होती. तर, राम शिंदे यांना ९२ हजार ४७७ मतं मिळाली होती. पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा जल्लोष करण्यात आला होता. विजयानंतर पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली होती, आणि त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले होते. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला.
मात्र गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात विविध मुद्द्यांवरून सातत्याने पवार विरुद्ध शिंदे असा वाद दिसून आला. त्यातच शिंदे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने ते २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढणार का? याकडे अनेकांचे लक्ष होते.
परंतु भापजने कर्जत-जामखेडमधून पुन्हा राम शिंदे यांनी संधी दिली आहे. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असाच सामना रंगणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा