maharashtra vidhan sabha election : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस बाकी, तिढा सुटेना?



ब्युरो टीम :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ सुरू आहे. राज्यामध्ये कोणता पक्ष  किती जागा लढणार? हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे.  त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होत आहे. राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत आहे. मात्र  अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. महायुतीतील तिढा सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बराच खल झाला. पण भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष किती नेमक्या जागा लढणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमधील वाद मिटण्याची शक्यता कमी असल्याने काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. 

दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागणार आहे. 

दरम्यान, २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपणार असून ३० ऑक्टोबरला सर्व प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. तर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने