Marathi Classical Language : माय मराठीसाठी ऐतिहासिक दिवस, मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा



ब्युरो टीम : केंद्र सरकारने मराठी भाषेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!” 


आपल्या पोस्टमध्ये फडणवीस यांनी म्हंटले आहे की,' मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने