Marathi Classical Language : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार, कारण...



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. 

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी व्यक्त केली आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांच्यासह मोलाचे सहकार्य करणाऱ्या तसेच मराठी भाषिक व मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने