Marathi Classical Language : भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं काय फायदा होतो? वाचा



ब्युरो टीम :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यानिमित्ताने मात्र भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय झालं? याचा फायदा काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला याचेच उत्तर देणार आहोत.

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे कोणत्या भाषेसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यामुळे संबंधित भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी कोट्यावधीचं अनुदान दिले जाते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये अभिजात दर्जा मिळालेली भाषा शिकण्याची व्यवस्था करणे, प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारणे, अशा प्रकारची कामे केली जातात. विशेष म्हणजे यापूर्वी देशात आतापर्यंत केवळ सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सर्वात प्रथम २००४ मध्ये तामिळ भाषेला अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम  आणि ओडिया या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. त्यातच आज, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी देशातील मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे आता असा दर्जा मिळालेल्या भाषांची संख्या ११ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने